मुंबई : राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंर राज्यात जल्लोष सुरु होत आहे. तर शिवसेनेकडून (Shiv Sena) राणे यांच्या निवडणवर टीका करण्यात आली आहे. आज राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मला फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन आला नाही, हे सांगताना उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, असा राणे यांनी टोला लगावला.
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या खोचक टीकेलाही नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का, असे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन इतके मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असा खोचक टोला लगावला. दरम्यान शरद पवार यांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली. त्यांनी चांगले काम कर, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याने राणेंनी सांगितले.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच झाडाझडती सुरू केली. राणे यांनी अधिका-यांचा क्लास घेतला. मला न सांगता तुम्हाला सुट्टी घेता येणार नाही, असे बजावले आहे. इथून पुढे मंत्र्याला न विचारता अधिका-यांनी सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांना पण हजेरी लावण्याची सक्ती केली आहे. दरम्यान, एमएसएमई अंतर्गत किती रोजगार दिला, याचीही माहिती त्यांनी घेतली. आत्मनिर्भर भारत अभियान कसं राबविलं आणि जीडीपीत एमएसएमईचा किती वाटा, याची माहिती राणे यांनी यावेळी घेतली.
दरम्यान, नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकमेंकाना टोले प्रतिटोले दिले. नारायण राणे यांची कामाची उंची मोठी पण खातं सूक्ष्म असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवसेनेला फटका बसावा यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेटचा अपमान असल्याची टीकाही राऊतांनी केलीय. तर राऊतांना काही तरी नेहमीच बोलायचं असतं, असं प्रत्युत्तर राणे यांनी राऊत यांना दिले.
तर दुसरीकडे नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागताच पंढरपुरात जल्लोष करण्यात आला. सकाळी संत नामदेव पायरी इथे विठ्ठलाच्या प्रतीकात्मक मूर्तीला राणे समर्थक सागर यादव यांनी दूग्धाभिषेक केला. तुळशीचा हार घालून देवाला पेढ्याचा नैवेद्य दाखवला.भाविकांना पेढा भरवून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच भाजप नेते नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिवाळी साजरी केली. ठाण्यातील राणे समर्थक सिताराम राणे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फाट्याक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटप करुन आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी राणे यांना केंद्रीय मंत्री पद दिल्याने भाजपला मोठी उभारी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.