नवी दिल्ली: सध्या राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दररोज नवे प्रश्न उपस्थित करून भाजपला अडचणीत आणत आहेत. मध्यंतरी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राफेल करारातील तांत्रिक बाबी स्पष्ट करून काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, सोमवारी एका हिंदी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्या अज्ञानामुळे पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. या चर्चेदरम्यान HAL कंपनीला जाणवत असलेल्या आर्थिक चणचणीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. तेव्हा अँकरने HAL च्या व्यवस्थापकीय संचालकांनीच कंपनीकडे पुरेसे पैसे (कॅश इन हँड) नसल्याची बाब मान्य केल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यावर शहानवाज हुसेन यांनी उत्साहाच्या भरात प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'कॅश इन हँडची गरजच काय आहे, आम्ही कॅशलेसवाले लोक आहोत'. त्यावेळी अँकरने हुसेन यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलाही इंग्रजी येते असे सांगत शहनवाज हुसेन यांनी अँकरला झुगारून लावले. यावर काय बोलावे, असा प्रश्न अँकरला पडला. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही कपाळावर हात मारून घेतला.
Anchor - Cash in hand negative me hai HAL ka
Shehnawaz - Hum cashless wale hai , aap kya chahte hai cash me de sab
Ye nahi dekha to kuch nahi dekha can't stop laughing pic.twitter.com/Gmrc6TSk9t
— Roshan Rai | روشن راۓ (@RoshanKrRai) January 7, 2019
राफेल करारातील आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा काही केल्या भाजपचा पिच्छा सोडायला तयार नाही. राफेलप्रकरणी संसदेत शुक्रवारी निर्मला सितारामन यांनी तांत्रिक तपशील सादर करत काँग्रेसच्या आरोपांचा जोरदार प्रतिवाद केला होता. यावेळी त्यांनी HAL कंपनीशी केंद्र सरकारने १ लाख कोटी रुपयांच्या कामासाठी करार झाल्याचा दावा केला होता. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या माहितीमध्ये विसंगती असल्याचे सांगत भाजपला पुन्हा कोंडीत पकडले होते. निर्मला सितारामन यांच्या संसदेतील भाषणानंतर काहीवेळातच HAL कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायला पैसे नसल्याची माहिती समोर आली होती. यानंतर निर्मला सितारामन यांनी सोमवारी HAL कंपनीला सरकारने २६,५७० कोटी रूपयेच दिल्याचा नवा खुलासा केला. त्यामुळे सितारामन यांनी अगोदर दिलेल्या माहितीमधील विसंगती उघड झाली. यावरून राहुल गांधी यांनी लगेचच भाजपला घेरले होते.