समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला

ईव्हीएमवर खासगी सुरक्षा रक्षकांची नजर

Updated: May 10, 2019, 01:44 PM IST
समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला title=

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अंबड इथल्या मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही आपला बंदोबस्त वाढवला आहे. त्यांनी तीन प्रतिनिधींची नेमणूक करत ईव्हीएम योग्य ठिकाणी ठेवलेले आहेत की नाही तसंच त्यांच्या प्रवेशद्वारांची सातत्याने पाहणी करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनीही खाजगी सुरक्षा रक्षक नेमल्याची बातमी झी चोवीस तासने दिली होती. त्यांना प्रतिनिधी म्हणून परवानगी देण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केलं.

याआधी अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आपली २४ तास खासगी सुरक्षा व्यवस्था नेमली आहे. सरकारी सुरक्षेवर विश्वास नसल्याचा दावा करत ही सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशी खासगी सुरक्षा नेमण्याचा प्रकार नाशिकमध्ये प्रथमच करण्यात आला आहे.

मतदारराजानं उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद केलं आहे. पण आता तिथे काही घातपात नको, याची धाकधुक एवढी वाढली आहे की नाशिकमधले अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी मतदान केंद्राबाहेर चक्क खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. तशी परवानगीही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात अशी खाजगी सुरक्षा नेमण्याचा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे.