भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकला- सॅम पित्रोदा

जगाशी अशा पद्धतीने वाटाघाटी करणे चुकीचे आहे, असे पित्रोदा यांनी सांगितले.

Updated: Mar 22, 2019, 11:46 AM IST
 भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकला- सॅम पित्रोदा title=

नवी दिल्ली: भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्याऐवजी पाकिस्तानशी चर्चा करायला पाहिजे होती, असे मत गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये खरंच ३०० दहशतवादी ठार झाले असतील तर सरकारने पुरावे सादर करून हा विषय संपवायला हवा. कारण, परदेशातील वृत्तपत्रांमध्ये याविषयी वेगळीच माहिती छापून आली आहे. त्यामुळे आपण खरंच बालाकोटमध्ये हल्ला केला का? या हल्ल्यात एकतरी दहशतवादी ठार झाला का?, अशा शंका माझ्या मनात उपस्थित झाल्या आहेत. देशाचा एक नागरिक म्हणून मला हे जाणून घेण्याचा हक्क आहे. यामुळे मी नागरिक म्हणून वाईटपणा ओढवून घेत असेन. पण म्हणून मी राष्ट्रप्रेमी नाही, असे नाही. मला केवळ सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, इतकेच माझे म्हणणे आहे, असे पित्रोदा यांनी म्हटले. 
 
याशिवाय, पित्रोदा यांनी बालाकोट एअर स्ट्राईकची खरचं गरज होती का, असा प्रश्नही उपस्थित केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. मी गांधीवादी विचारांचा व्यक्ती आहे. त्यामुळे चर्चेने प्रश्न सुटतात, अशी माझी धारण आहे. मुंबईवरील २६\११ हल्ला असो किंवा पुलवामाची घटना असो, असे हल्ले होतच असतात. तेव्हाही भारतीय विमाने पाकच्या हद्दीत शिरली होती. मात्र, हा निर्णय योग्य होता, असे मला वाटत नाही. काही जणांनी हल्ला केल्यामुळे तुम्ही संपूर्ण देशाला (पाकिस्तानला) जबाबदार धरू शकत नाही. अशी प्रकरणे हाताळण्याचा हा योग्य दृष्टीकोन नाही. माझ्या मते जगाशी अशा पद्धतीने वाटाघाटी करणे चुकीचे आहे, असे पित्रोदा यांनी सांगितले. 

पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच ट्विट करून पित्रोदा यांच्या विधानावर तोफ डागली. मोदींनी म्हटले आहे की, गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी बालाकोट येथे भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्षांच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक असणाऱ्या सॅम पित्रेदा यांनी भारतीय सैन्यदलावर अविश्वास दाखवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाची एकप्रकारे समर्पक सुरुवात केल्याचा उपरोधिक टोलाही मोदींनी लगावला.