नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी स्वत:हून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी सांगितलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निव़डणूक लढण्याचा आदेश दिला, तर निवडणूक लढवेन असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांनी केलं होतं. त्यानंतर काँग्रेसनं अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिल्यानं त्यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र निवडणूक लढण्यापासून त्यांना कोणी रोखलं याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर या निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतल्याचं पित्रोदा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने यामागे अनेक कारणं समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना निवडणूक न लढवण्य़ास सांगितलं अशी याआधी चर्चा होती. मोठ्या नेत्यांविरोधात गांधी परिवारातून कोणीही निवडणूक लढवणार नाही अशी प्रथा नेहरूंनी आणली होती. त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढवली नाही. असं देखील बोललं जातं होतं. पण खरं कारण काय आहे हे प्रियंका गांधीच सांगू शकतात.