मोदींनी ध्यानधारणा केलेल्या 'त्या' गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल

केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे.

Updated: Sep 13, 2019, 01:37 PM IST
मोदींनी ध्यानधारणा केलेल्या 'त्या' गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा एका गोष्टीमुळे चांगलाच गाजला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या परिसरातील एका गुहेत ध्यानधारणा केली होती. या सगळ्यानंतर ध्यानधारणेसाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेल्या या गुहेचा तपशील समोर आला होता. यानंतर ही गुहा चांगलीच चर्चेत आली होती. 

ताज्या माहितीनुसार, आता या गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी लोकांनी जागा आरक्षित केल्याचे समजते. या माध्यमातून आतापर्यंत गढवाल मंडल विकास निगमला ९५ हजारांचे उत्त्पन्न मिळाले आहे. 

गढवाल मंडल विकास निगमतर्फे (जीएमव्हीएन) गेल्यावर्षीपासून केदारनाथ येथे या गुहेची सोय करून देण्यात आली होती. केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अशाप्रकारे गुहा तयार करण्याची कल्पना सुचविली होती. सुरूवातीला या गुहेत राहण्याचे एका दिवसाचे भाडे ३००० रूपये इतके होते. तसेच ही गुहा किमान तीन दिवसांसाठी भाड्याने घेण्याची अट होती. मात्र, पर्यटकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे भाडे ९९० रूपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. सध्या या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी प्रतिरात्र १५०० आणि प्रतिदिन ९९० रूपये मोजावे लागतात.

या गुहेत पर्यटकांना लाईट, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह अशा प्राथमिक सुविधा पुरवल्या जातात. तसेच पर्यटकांच्या गरजेनुसार दिवसातून दोन वेळा नाश्ता आणि जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. ही गुहा केवळ ध्यानधारणेसाठी विकसित करण्यात आल्याने याठिकाणी फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जातो. जेणेकरून पर्यटकांना एकांत मिळेल. मात्र, अगदीच मदतीची गरज पडली तर संपर्क साधण्यासाठी याठिकाणी फोनचीही सोय उपलब्ध आहे.