'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर

RSS Leader Slams BJP: जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना प्रभू रामचंद्रांचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधील प्रमुख नेत्याने भाजपावर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2024, 10:30 AM IST
'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर title=
भाजपावर साधला निशाणा

RSS Leader Slams BJP:  लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वारंवार खटके उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरसंदर्भात चिंता व्यक्त केल्यानंतर संघाच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रातून भाजपाच्या पराभवावर भाष्य करण्यात आलं. आता यानंतर थेट जाहीर कार्यक्रमामधून संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. राजस्थानमधील कानोता येथील एका जाहीर कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी, 'राम सर्वांबरोबर न्याय करतो,' असं सूचक विधान केलं आहे. इंद्रेश कुमार जयपुरजवळच्या कानोता गावामधील रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन सोहळ्यात बोलत होते.

भाजपाला लगावला टोला

"रामचा विरोध करणाऱ्यांना शक्ती मिळाली नाही. रामाने त्यांना थोडीही शक्ती दिली नाही. ते सर्वजण (इंडिया आघाडीतील पक्ष) एकत्र येऊनही पहिल्या क्रमांकावर राहिले नाहीत. ते दुसऱ्या क्रमांकावरच राहिले. तसेच ज्या पक्षाने रामाची भक्ती केली त्यांना यश मिळालं. मात्र त्या पक्षाला (भाजपाला) अहंकार आल्याने रामाने त्यांना 241 पर्यंतच पोहचवलं. मात्र तरीही हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. ज्यांना रामाप्रती आस्था नाही, श्रद्धा नाही त्यांना रामाने थांबवलं. तुम्हाला यश मिळणार नाही हेच तुमच्या अनास्थेसाठीचं प्रायिश्चित्त आहे, असं रामाने सांगितलं," असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलं. 

अयोध्येतील भाजपा उमेदवारालाही सल्ला

अयोध्येतील भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांनी जनतेवर अत्याचार केले तर त्यांना 5 वर्षांचा आराम दिला आहे, असंही इंद्रेश कुमार म्हणाले आहेत. इंद्रेश कुमार यांनी लल्लू सिंह यांच्याबद्दल बोलताना, "जो रामाची भक्ती केली तरी अहंकार ठेवला तर असं होतं. रामाचा विरोध केला तर तुमचं कल्याण होणार नाही. लल्लू सिंह यांनी जनतेवर अत्याचार केल्याने रामचंद्रांनी त्यांना 5 वर्ष आराम करण्यास सांगत नंतर पाहू, असा संदेश दिला," असं म्हटलं.

नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा

कोण आहेत इंद्रेश कुमार?

इंद्रेश कुमार हे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. तसेच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक म्हणून ही काम पाहतात. ते संघाचे ज्येष्ठ प्रचारक आहेत. मुस्लिमांना संघांच्या विचारांबरोबर जोडण्यासाठी इंद्रेश कुमार यांनी 2002 साली मुस्लिम राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. इंद्रेश कुमार यांनी हिमालय परिवार, माजी सैनिकांच्या संघटनेची स्थापनाही केली आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये संघाचे प्रचारक होते. राजस्थानबरोबरही इंद्रेस कुमार यांचं खास नातं राहिलं आहे.