Gold Price In India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै रोजी देशाचा 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव सातत्याने पडत आहेत. अर्थमंत्र्यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली आहे. त्यानंतर सोन्याचे दर 24 तासांमध्ये पाच टक्क्यांहून अधिक पडले आहेत. 23 जुलै ते 27 जुलैचा विचार केला तर सोन्याच्या दरात 7.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एका दिवसात 5 टक्क्यांहून अधिकची घसरण सोन्याच्या दरात झाली होती याचा जरी विचार केला तरी या घसरणीमुळे भारतामधील सर्व सोन्याचा विचार केल्यास तब्बल 10.7 लाख कोटी रुपयांचा चुरडा झाला असं म्हणता येईल. सोन्याची किंमत पडल्याने जी घसरण झाली त्यामुळे एकूण मूल्य कमी झालं आहे. शेअर बाजाराशी तुलना केली तर एका दिवसात सर्वात मोठा आर्थिक फटका बसण्याची ही सहावी सर्वात मोठी घटना ठरेल.
विशेष म्हणजे या 10 लाख कोटींच्या तोट्यामध्ये सर्वात मोठा फटका देशात सोनं असलेल्या प्रत्येक नागरिकाला बसला आहे, असं मनीकंट्रोलचं म्हणणं आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर सरकार आणि बँकांकडे नाही तेवढं सोनं सर्वसामान्य भारतीयांकडे आहे. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या घरात सोनं आहे त्यांच्या सोन्याची किंमत कमी झाली आहे असं म्हणता येईल. जगभरातील सर्वाधिक सोन्याची मालकी असलेले देश, संस्था आणि बँकांचा विचार केला तरी सर्व भारतीयांकडे असणारं सोनं हे अधिक आहे. सध्या जगभरातील एकूण सोन्याच्या मालकीपैकी 11 टक्के सोनं हे सर्वसामान्य भारतीयांच्या घरात आहे. हे एवडं सोनं म्हणजे अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेकडे असलेल्या सोन्याच्या एकत्रित मूल्यापेक्षाही अधिक आहे.
खरं तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. सेन्सेक्सपेक्षा सोन्याच्या दरातील भरभराट अधिक असल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 11 टक्क्यांनी वाढला तर सोन्यातील दराची वाढ ही तब्बल 14.7 टक्के इतकी राहिली. एमसीएक्स गोल्डचा विचार केला तर जुलै महिन्यात त्याचे दर 5.2 टक्क्यांनी घसरलेत.
अर्थसंकल्पाचा सोन्याच्या दरावर कसा परिणाम झाला?
22 जुलै (अर्थसंकल्पाच्या आधीचा दिवस) - 72,875 रुपये /तोळा
23 जुलै (अर्थसंकल्पाचा दिवस) - 69,269 रुपये /तोळा
आता भारतीयांकडे एकूण 30 हजार टन सोनं आहे असं गृहीत धरलं तर याच दोन तारखांना या सोन्याचा दर किती होईल ते पाहूयात..
22 जुलै (अर्थसंकल्पाच्या आधीचा दिवस) - 218.63 लाख कोटी रुपये
23 जुलै (अर्थसंकल्पाचा दिवस) - 207.89 लाख कोटी रुपये
एका दिवसात भारतीयांकडे असलेल्या सोन्याच्या किंमतीत झालेली एकूण घट - 10.74 लाख कोटी रुपये
अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी सोनं आणि चांदीवरील बेसिक कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचं सांगितलं. तसेच कृषी विकास उपकरही 5 टक्क्यांवरुन 1 टक्के केल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे सोनं-चांदीवरील सरासरी 18.5 टक्के कर (जीएसटीचा समावेश करुन) 9 टक्क्यांवर आला.
सोन्याचे दर कमी करण्याच्या निर्णयाने सोने व्यापारी समाधानी नाहीत. त्यामुळे सोने व्यापारी त्यांच्याकडे असलेलं सोनं लवकरात लवकर विकत असून कमी तोटा होईल असं पाहत आहेत. सोन्यामध्ये पैसे गुंतवणारेही या निर्णयाने फारसे समाधानी नाहीत. सोन्याची किंमत कमी झाल्याने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या लोन टू व्हॅल्यू (एलटीव्ही) गुणोत्तर कमी होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात आल्यासारखं होणार. एलटीएस म्हणजेच सोन्याच्या मोबदल्यात दिल्या जाणारं कर्जावरही याचा परिणाम होणार. सोन्याची किंमत कमी झाल्याने तुलनेनं कमी कर्ज तेवढ्याच सोन्याच्या मोबदल्यात मिळणार ज्यावर अधिक कर्ज मिळायचं. भारतीय नागरिक आण देशातील मंदिरांकडे 30 हजार टन सोनं असून या सोन्याची किंमतही कमी झाली आहे.
मात्र याचा फायदा संस्थात्मक पद्धतीने सोन्याचा व्यवहार करणाऱ्यांना होणार आहे. सोनं व्यापाऱ्यांनी सोन्यावरील कर कमी करण्याची मागणी फार पूर्वीपासून लावून धरली होती. सोन्यावरील ड्युटी कमी झाल्याने त्याच्या तस्करीचं प्रमाण कमी होईल असं सागितलं जातं. मात्र सोन्याची तस्करी कमी होण्याची सकारात्मक बाब नक्कीच होईल. मात्र दुसरीकडे यामुळे सरकारच्या कमाईवरही फरक पडेल. कारण भारत हा सर्वाधिक सोनं आयात करणारा देश आहे.
आता सणासुदीच्या कालावधीमध्ये सोन्याचे दर परत वाढवण्यासाठी बाजारातूनच प्रयत्न केले जातील. तसेच अमेरिकेमधील निवडणूक, युद्धाची पार्श्वभूमी, आरबीआयचं धोरण यासारख्या गोष्टींचा भविष्यात सोन्याच्या किंमतीवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.