कोरोनाचा परिणाम, रिलायन्सने घेतला कर्मचाऱ्यांचा पगार कमी करण्याचा निर्णय

कोरोनाचा उद्योग धंद्यांवर परिणाम

Updated: Apr 30, 2020, 06:23 PM IST
कोरोनाचा परिणाम, रिलायन्सने घेतला कर्मचाऱ्यांचा पगार कमी करण्याचा निर्णय title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवसायावर कोरोना साथीचा परिणाम झाला आहे. विशेषत: हायड्रोकार्बनच्या व्यवसायात तोटा सुरु झाला आहे. कारण रिलायन्सच्या रिफाईंड प्रोडक्ट आणि पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाली आहे.

आता, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कंपनीने हायड्रोकार्बन व्यवसायाशी संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायात काम करणाऱ्या ज्या कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतन 15 लाखाहून अधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्क्यांनी कपात केली जाईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, ज्यांचे वेतन वार्षिक 15 लाखांनी कमी असेल त्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या सर्व संचालकांच्या पगारामध्ये 30 ते 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, कामगिरीवर आधारित बोनसही आता पुढे ढकलण्यात आले आहेत. (फोटो: फाईल)

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, कंपनीचे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी स्वत: एक वर्षाची भरपाई घेणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की लॉकडाऊनमुळे पेट्रोलियमची मागणी घटली आहे, ज्यामुळे हायड्रोकार्बन व्यवसायाचा महसूल घटला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक हितल आर मेसवानी यांनी कंपनीच्या या निर्णयाबाबत कर्मचार्‍यांना पत्र पाठविले आहे. नफ्यातील घट लक्षात घेता वेतन कपातीचा हा निर्णय घेण्यात आल्याचं यात नमूद केले आहे. (फोटो: फाईल)

विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही अहवाल गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच फेसबुक आणि जिओ यांच्यात मोठा करार झाला आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, त्यांची कंपनी 18 महिन्यांपर्यंत म्हणजेच मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त होईल.