करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या; घरात घुसून केला गोळीबार

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2023, 06:07 PM IST
करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या; घरात घुसून केला गोळीबार title=

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या घऱात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारचे लोक धावत घटनास्थळी दाखल झाले होते. सुखदेव सिंह गोगामेडी यांना तात्काळ मेट्रोजवळ असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासोबत असणारे अजित सिंह गंभीर  जखमी झाले आहेत.  

पोलिसांनी सांगितलं आहे की, सुखदेव सिंह गोगामेडी मंगळवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास श्यामनगर जनपथ येथील घरात होते. याचवेळी हल्लेखोर त्यांच्या घरी आले. यानंतर त्यांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळीबार सुरु केला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या हत्येनंतर राजपूत समाजात संताप असून निदर्शन करत आहेत. रुग्णालयाबाहेर काही आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. बिष्णोई गँगच्या गॅगस्टरने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

या हत्याकांडावर जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितलं की, हल्लेखोरांची ओळख पटली आहे. क्रॉस फायरिंग केली असताना नवीन सिंग शेखावत नावाच्या एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. तो जय़पूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता आणि कपड्यांचे दुकान चालवत होता. उर्वरित दोन हल्लेखोरांनी स्कूटर हिसकावून पळ काढला. 

सुरक्षा रक्षकाशी बोलून हल्लेखोर आत गेले होते. गोगामेडी यांच्या सांगण्यावरूनच त्यांना सकाळी आत बोलावण्यात आलं होतं. हल्लेखोर गोगामेडी यांच्याशी बोलत होते, त्यानंतर काही वेळातच त्यांनी सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांचा मृत्यू झाला.