राज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत

शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest ) राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार चर्चा झाली यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 

Updated: Feb 5, 2021, 02:10 PM IST
राज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत   title=

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest ) राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार चर्चा झाली यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना (farmers) बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी हे आंदोलन म्हणजे चिंतेचा विषय आहे, अन्नदात्याला असुरक्षित का वाटतयं, यावर चर्चा केली पाहिजे, असं ते म्हणालेत. (Rajya Sabha: Conspiracy to defame farmers - Sanjay Raut)

संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असेच चालले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते  राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले. 

लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. मात्र, हा अपमान कोणी केला? त्याला मात्र तुम्ही पकडले का, नाही ना? असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला. प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आहेत, मात्र देशप्रेमी कोण आहे तर अर्णब गोस्वामी, कंगना रानौत? हे देशप्रेमी आहेत का? असा प्रश्न विचारत यांना सरकारने शरण दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. 

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन शांततेत चालले होते. शेतकरी आंदोलनाची एकजुटता तोडण्यात सरकारला अपयश आले. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि या एकजुटतेमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो. पंजाब, हरियाणाचा शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे.  ही केवळ लढाई त्यांचीच नाही तर देशातील शेतकऱ्याची आहे.  संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत ठणकावून सांगितले.