'आकाश पाताळ एक करुन...'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा

भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढून असं ते म्हणाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Dec 26, 2023, 04:44 PM IST
'आकाश पाताळ एक करुन...'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा title=

भारतात येत असलेल्या व्यापारी जहाजावर शनिवारी ड्रोन हल्ला करण्यात आला होता. यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने हा हल्ला गांभीर्याने घेतला असून, हल्लेखोरांना समुद्राच्या तळातूनही शोधून काढू असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मंगळवारी आयएनएस इंफाळच्या कमिशनिंगदरम्यान राजनाथ सिंग म्हणाले की, "आजकाल समुद्रात हालचाली फार वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक आणि धोरणात्मक शक्तीमुले काहींच्या मनात द्वेष आणि ईर्ष्या निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या एमव्ही केम प्लुटोवर झालेला ड्रोन हल्ला आणि काही दिवसांपूर्वी 'एमव्ही साईबाबा'वर झालेल्या हल्ल्याला भारताने फार गांभीर्याने घेतलं आहे".

पुढे ते म्हणाले की, "भारतीय नौदलाने समुद्रातील देखरेख वाढवली आहे. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढू. या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल".

समुद्री मार्ग सुरक्षित करणार - राजनाथ

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी समुद्री मार्ग सुरक्षित करणार असल्याचं आश्वासन दिलं. ते म्हणाले की, भारत संपूर्ण इंडियन ओशियन रिजनमध्ये सुरक्षा पुरवतो. या परिसरात होणाऱ्या समुद्री व्यवहार एक वेगळी उंची गाठेल यासाठी आम्ही प्रयत्न करु. यासाठी आम्ही मित्र देशांसह मिळून समुद्री मार्ग व्यापारांसाठी सुरक्षित करु असं त्यांनी सांगितलं. 

शनिवारी अरबी समुद्रात 'एमव्ही केम प्लुटो'वर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. हे जहाज सौदी अरबच्या बंदरातून भारताच्या मंगलोरला येत होतं. गुजरातच्या वेरावलपासून 200 किमी दक्षिण पश्चिम येथे हा हल्ला झाला. रिपोर्टनुसार, बोटीत 21 भारतीय होते. ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. पण वेळेत ही आग विझवण्यात आली.