नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमधली अंतर्गत भांडणं वाढत असल्याचं समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातले मतभेद वाढत चालले आहेत. हरियाणाच्या मानेसरमध्ये काँग्रेसचे १० पेक्षा जास्त आमदार पोहोचले आहेत. एवढच नाही तर पायलट समर्थक अनेक आमदारांचे फोनही बंद आहेत. या आमदारांना दिल्लीला बोलावलं जाऊ शकतं.
या सगळ्या वादामध्येच राजस्थानच्या एसओजीनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळाल्यामुळे सचिन पायलट नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या काही आमदारांसोबत दिल्ली गाठली आहे, तर काही आमदार हरियाणामध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीलाही सचिन पायलट उपस्थित नव्हते. सचिन पायलट यांच्यासोबत असलेले आमदार दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुखांना भेटून आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. हे आमदार गुरुग्रामजवळ थांबले असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार जितेंद्र सिंग यांनी जयपूरमधून दिली.
भाजपकडून घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता. सरकार पाडण्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने जो FIR दाखल केला आहे. या प्रकरणात २ भाजप नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
२०१८ साली राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा होती. पण गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं. तरीही सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातले वाद कमी होत नसल्याचंच चित्र राजस्थान काँग्रेसमध्ये आहे.