नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शनिवारी सीएम अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. पण या बैठकीला सचिन पायलट उपस्थित नव्हते. सध्या ते दिल्लीत आहेत. राजस्थानचे जवळपास 10 आमदार दिल्लीत आहेत. हे आमदार काँग्रेसच्या प्रमुखांना भेटून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत. हे आमदार गुरुग्रामजवळ थांबले आहेत. जयपूरमध्ये काँग्रेसचे आमदार जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. पण हे आमदार उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासोबत आहेत असं त्यांनी म्हटलं नाही.
सचिन पायलट राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. 2018 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण पक्षाच्या प्रमुखांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री केलं. गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद कमी करण्यासाठी सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्ष देखील बनवण्यात आले.
सचिन पायलट उपमुख्यमंत्री तर बनले. पण दोन्ही नेत्यांमध्ये वाद कमी झाला नाही. शनिवारी जेव्हा सीएम अशोक गहलोत यांना राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गटबाजीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी याबाबत नकार दिला.
सरकार पाडण्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने जो FIR दाखल केला आहे. या प्रकरणात २ भाजप नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे.