"तुम्ही पाप केले आहे, परिणाम भोगावे लागतील..."; Tina Dabi यांना गेहलोत सरकारचा इशारा

IAS Tina Dabi : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अमरसागर परिसरात राहणाऱ्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळेच टीना दाबी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आकाश नेटके | Updated: May 19, 2023, 05:01 PM IST
"तुम्ही पाप केले आहे, परिणाम भोगावे लागतील..."; Tina Dabi यांना गेहलोत सरकारचा इशारा title=

Rajasthan News : पाकिस्तानातून (Pakistan) विस्थापित झालेल्या हिंदूंच्या (Hindu) तात्पुरत्या वस्त्यांवर कारवाई केल्याने जिल्हाधिकारी टीना दाबी (Tina Dabi) अडचणीत येण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जैसलमेर (Jaisalmer) जिल्ह्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमर सागर परिसरात पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंची घरे जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर जमीनदोस्त करण्यात आली. याप्रकरणी आता अशोक गेहलोत सरकारने (Ashok Gehlot Goverment) जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. राजस्थान सरकारमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.

राजस्थानचे मंत्री प्रताप खचरियावास यांनी या कारवाईवरुन इशारा दिला आहे. राजस्थान सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. अधिकाऱ्यांनी जे काही केले ते चुकीचे आहे, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा प्रताप सिंह यांनी दिला आहे. 

"पाकिस्तानातून आलेले हिंदू जैसलमेरमध्ये मोकळ्या जागेवर राहत आहेत. राजस्थान सरकारकडून त्यांना कागदपत्रेही दिली जात आहेत. राजस्थान सरकारच्या नियमानुसार त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय कोणालाही बेदखल करता येत नाही. ही बाब गंभीर आहे. अधिकाऱ्यांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. एवढ्या उन्हाळ्यात तुम्ही अचानक जाऊन त्यांची घरे उद्ध्वस्त केलीत. याप्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेन. ही अतिशय गंभीर घटना आहे. अशा अधिकाऱ्यांची पाप केले आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील," असेही मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी दिला.

जैसलमेर जिल्ह्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमर सागर भागात राहणाऱ्या पाकिस्तानातील हिंदू स्थलांतरितांची घरे जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर पाडण्यात आली. 50 हून अधिक घरे असल्याने अधिकाऱ्यांनी बुलडोझर आणि जेसीबीच्या सहाय्याने ती जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे 150 महिला, पुरुष व बालक हे सर्वजण उघड्यावर आले. अमर सागर तलावाच्या काठावर पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंनी बेकायदेशीर घरे बांधल्याचा आरोप प्रशासनाचे केला आहे. या घरांमुळे तलावातून पाणी येणे बंद झाले होते.  ही जमीन अत्यंत मौल्यवान असल्याचेही म्हटंले जात आहे.

टीना दाबी यांनी दिले उत्तर

या कारवाईनंतर टीना दाबी यांनी याबाबत भाष्य केले आहे. "आम्ही 5 एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले होते. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण अनेकांना ते पटले नाही. ते ज्या ठिकाणी राहत होते ती जागा आधीच इतरांना देण्यात आली होती. मात्र, स्थलांतरितांना जमिनीचे योग्य वाटप होईपर्यंत त्यांना निवारागृहात नेले जाईल. ज्यांना नागरिकत्व मिळाले आहे, त्यांना जमिनीचे वाटप केले जाईल. काल काढण्यात आलेली अतिक्रमणे ही गेल्या 10 दिवसांतील आहेत," असे टीना दाबी म्हणाल्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सीमेपलीकडील हिंदू स्थलांतरितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि त्यांना लवकरच जमीन दिली जाईल. आठवडाभरात जमीन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंनी आंदोलन मागे घेतले आहे.