जयपूर : राजस्थानमधली (Rajasthan) अशोक गेहलोत सरकारमधील (Ashok Gehlot Government) एका मंत्र्याच्या अजब वक्तव्याची सध्या देशभर चर्चा आहे. राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजेंद्र गुढ यांनी रस्त्यांची तुलना चक्क अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या गालाशी केली आहे. कतरिना कैफच्या (Katrina Kaif) गालासारखे रस्ते असावेत असं विधान राजेंद्र गुढा यांनी केलं आहे.
मंत्र्यांवर कारवाईची मागणी
त्यांच्या या विधानानंतर शाब्दिक वाद उसळला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मंत्र्यावर कारवाई करावी, असं राजस्थानचे भाजपचे प्रवक्ते रामलाल शर्मा यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर महिला शक्तीबद्दल असे अपमानास्पद वक्तव्य करणं अशोभनीय आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेने कठोर पावले उचलावीत.
कतरिनाच्या गालासारखे रस्ते हवेत
राजस्थानचे ग्रामीण विकास राज्यमंत्री राजेंद्र गुढा झुंझुनू जिल्ह्यातील एका गावात शिबिरासाठी गेले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रस्ते अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या गालासारखे चकचकीत करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
हेमा मालिनी आता म्हातारी झाली आहे असं सांगत त्यांनी उपस्थितांना विचारलं सध्या कोणती अभिनेत्री आहे, तेव्हा लोकांनी कतरिना कैफचं नाव घेतले. यानंतर मंत्री राजेंद्र गुढा म्हणाले की, जिल्ह्यातील रस्ते कतरिना कैफच्या गालासारखे बनवा.
याच आठवड्यात झाले मंत्री
राजेंद्र गुढा यांनी यापूर्वी बसपाचे उमेदवार म्हणून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. गेल्या वर्षी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केले तेव्हा गुढासह सर्व 6 BSP आमदारांनी गेहलोत सरकारला पाठिंबा दिला आणि नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. या निष्ठेबद्दल गुढा यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुढा यांना या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री बनवलं.