'या' राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, महाराष्ट्रात कधी होणार?

आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत

Updated: Nov 16, 2021, 10:56 PM IST
'या' राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, महाराष्ट्रात कधी होणार? title=

जयपूर : राजस्थान सरकारने (Rajasthan Government) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय (Petrol Diesel Price Reduce) घेतला आहे. या निर्णयानंतर राजस्थानमध्येही पेट्रोल 4 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून नवे दर लागू होतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय
मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी कॅबिनेट बैठकीनंतर ट्विट केलं, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट दर कमी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानंतर आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोलवर प्रतिलिटर 4 रुपये आणि डिझेलमध्ये 5 रुपयांची कपात होणार आहे. गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे राज्य सरकारचा वार्षिक 3500 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे दबाव
केंद्र सरकराने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारवर व्हॅट कमी करण्याचा दबाव होता. विरोधी पक्ष भाजपनेही व्हॅट कमी करण्याची मागणी करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

महाराष्ट्रात कधी होणार?
केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकार हे कधी 'करून दाखवणार'?, असा सवाल महाराष्ट्र भाजपकडून विचारण्यात येत आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला आधार द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता केंद्र सरकारने लवकरात लवकर जीएसटी परतावा देणे आवश्यक आहे. हा परतावा मिळाल्यास लोकांच्या हितासाठी व्हॅटबाबत राज्य सरकारला सकारात्मक निर्णय घेता येईल', असं उत्तर पवार यांनी दिलं होतं.