... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार

राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे

Updated: Dec 11, 2018, 03:14 PM IST
... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार title=

नवी दिल्ली - राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. राज्यात परत एकदा सत्तापालट होणार हे स्पष्ट झाले असून, काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर येणार आहे. पण हा मुख्यमंत्री कोण असणार, हे अद्याप निश्चित नाही. राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी घेतील, असे पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. 

राजस्थान विधानसभेत एकूण २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. एक जागेवरील उमेदवाराचे निधन झाल्यामुळे तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये १०० हून अधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ८० जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत.

मतमोजणीचा हाच कल शेवटपर्यंत कायम राहिल्यास राज्यात काँग्रेस सत्तेवर येईल, हे निश्चित आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत यांच्यासह तरुण नेते सचिन पायलट यांच्याही नावाची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांनी राजस्थानमधील निवडणुकीत पक्षाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. राजस्थानमधील पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, अशा प्रश्न पत्रकारांनी गेहलोत यांना विचारल्यावर त्यांनी राहुल गांधीच हा निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. 

राजस्थानमध्ये मंगळवारी सकाळपासूनच काँग्रेस समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या त्यांच्या झालरापाटन जागेवरून आघाडीवर आहेत. सचिन पायलट हे सुद्धा टोंक विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान झाले होते. ७२.७० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क यावेळी बजावला होता.