रेल्वे तिकिट खरेदी करणं आणखीन सोपं, मोबाईल अॅपवरुन जबरदस्त सुविधा

...

Updated: Jun 14, 2018, 10:39 AM IST
रेल्वे तिकिट खरेदी करणं आणखीन सोपं, मोबाईल अॅपवरुन जबरदस्त सुविधा  title=

नवी दिल्ली : तुम्ही रेल्वेने प्रवास करता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, अनारक्षित तिकिटांचं बुकिंग आणि हे बुकिंग रद्द करण्यासोबतच इतरही सुविधांसह एक खास मोबाईल अॅप रेल्वेने सुरु केलं आहे. या अॅपमध्ये सीजन आणि प्लॅटफॉर्म तिकीटांचं नवीनीकरण, आर-वॉलेट, यूजर प्रोफाईल मॅनेजमेंटसह इतरही सुविधांचाही समावेश आहे.

रेल्वेच्या सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) ने एक मोबाईल अॅप्लिकेशन 'अटसनमोबाईल' लॉन्च केलं आहे. युजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा विंडोज स्टोअरवरुन नि:शुल्क डाऊनलोड करु शकतात. त्यासोबतच रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावं याची माहितीही देण्यात आली आहे. 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी करण्यासाठी प्रवाशांना सर्वातआधी आपला मोबाईल नंबर, नाव, शहर, रेल्वेचं डिफॉल्ट बुकिंग, श्रेणी, तिकिटाचा प्रकार, प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी लागणार आहे. नोंदणी करताच प्रवाशांचं रेल्वे वॉलेट (आर-वॉलेट) अकाऊंट सुरु होईल. खास बाब म्हणजे आर-वॉलेट सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क द्याव लागणार नाहीये. आर-वॉलेट तुम्ही कुठल्याही यूटीएस काऊंटर किंवा वेबसाईटवरुन रिचार्ज करु शकता.

मात्र, यामध्ये आगाऊ तिकिट बुकिंग करण्याची सुविधा नाहीये म्हणजेच प्रवासी केवळ वर्तमान स्थितीतच प्रवास करु शकतात. तसेच तिकिटाची प्रिंट काढल्याशिवायही तुम्ही रेल्वे प्रवास करु शकणार आहेत. प्रवासा दरम्यान टीसीने तिकिटाची मागणी केली असता तुम्ही अॅपमधील तिकिट दाखवू शकता.