'महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा, अन्यथा वांझोटं राहावं'

पन्नालाल शाक्य एका कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा लावत होते... पण, बोलता बोलता त्यांचा तोल गेला आणि...

Updated: Jun 14, 2018, 09:53 AM IST
'महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा, अन्यथा वांझोटं राहावं' title=

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मध्यप्रदेश भाजपचे एक आमदार महाशय पुन्हा देशपातळीवर चर्चेत आलेत.... या महाशयांचं नाव आहे पन्नालाल शाक्य... ते गुना इथून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेत. पण, महिलांविषयी केलेलं एक वक्तव्य पन्नालाल आणि त्यांच्या पक्षाला चांगलंच महागात पडू शकतं. 

पन्नालाल शाक्य एका कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा लावत होते... पण, बोलता बोलता त्यांचा तोल गेला आणि त्यांनी असं काही विधान केलं की समोर बसलेलेही अवाक झाले... 

'काँग्रेसनं म्हटलं होतं की गरीबी हटवणार, पण त्यांनी तर गरिबांनाच हटवलं. तिथं अशा महिला आहेत ज्या या नेत्यांना जन्म देतात... ज्या महिला संस्कारी मुलांना, समाजाच्या भल्याचा विचार न करणाऱ्या मुलांना जन्म देऊ शकत नाहीत त्यांनी वांझच राहावं' असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. 

पन्नालाल शाक्य यांच्या या विधानावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शांत राहणंच पसंत केलंय. पक्षाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. 

याआधीही, इटलीमध्ये विवाह रचणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या 'देशभक्ती'वर प्रश्नचिन्ह निर्माण करत पन्नालाल शाक्य चर्चेत आले होते.