राफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका, राहुल गांधींची पुन्हा टीका

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका लागला. राहुल गांधींना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

ANI | Updated: Apr 10, 2019, 07:53 PM IST
राफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका, राहुल गांधींची पुन्हा टीका title=

नवी दिल्ली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राफेलप्रकरणी मोदी सरकारला झटका लागलाय. सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिलीय.  गहाळ झालेल्या कागदपत्रांना ग्राह्य मानू नका हा केंद्राचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र याचिकाकर्त्यांची तीनच कागदपत्र ग्राह्य धरत आदेशाचा फेरविचार शक्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. 

चौकीदार चोर आहे हे आता सर्वोच्च न्यायालयानेही ही मान्य केले आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राफेल संबंधीची काही कागदपत्रे लीक झाली होती, यावर सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली ही कागदपत्रे मान्य असल्याचे न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत म्हटले. त्यामुळे हा सरकारसाठी मोठा धक्का ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सुनावणीला परवानगी देणे म्हणजे दोषी ठरवणे नव्हे असं सांगत राहुल गांधी यांनी केलेले आरोप म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. अनिल अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना पैसे दिले, असे कोर्टाने म्हटल्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. हे साफ खोटे असून हा न्यायालयाचा अवमान आहे.