'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया

आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Nov 9, 2017, 05:08 PM IST
'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नाकारली आहे. रघुराम राजन यांच्या कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रघुराम राजन सध्या अमेरिकेतल्या शिकागो विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत, आणि हे काम सोडण्याचा राजन यांचा कोणताही विचार नाही, असं राजन यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी दिल्लीच्या सत्तेत असलेली आम आदमी पार्टी (आप) आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना उमेदवारी द्यायच्या तयारीमध्ये होती.

राज्यसभेच्या उमेदवारांसाठी अरविंद केजरीवाल पक्षाबाहेरच्या बुद्धीजीवी उमेदवारांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा खासदारकीसाठी पक्षाबाहेरच्यांना उमेदवारी द्यायचा निर्णय झाला आहे. समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांना आपकडून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती आपच्या बड्या नेत्यानं दिल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियानं केला आहे.

आपमध्ये अंतगर्त कलह?

पक्षाबाहेरच्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर आपमध्ये अंतर्गत कलह व्हायची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आमदार अमानतुल्ला खान यांचं निलंबन आपनं मागे घेतलं होतं. आपचे नेते कुमार विश्वास यांनी निलंबन मागे घ्यायच्या निर्णयाचा विरोध केला होता. माझ्या राज्यसभेमध्ये जाण्यात अडथळे निर्माण करण्यासाठी हे निलंबन मागे घेण्यात आल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता.

माणूस असल्यामुळे माझ्या काही इच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया कुमार विश्वास राज्यसभा खासदारकीच्या प्रश्नावर दिली होती. कुमार विश्वास आरएसएसचे एजंट असल्याची टीका अमानतुल्ला खान यांनी केली होती. यानंतर अमानतुल्ला यांचं निलंबन करण्यात आलं होतं पण आता हे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.