कत्तलखान्यांपासून दूर राहा! Q Fever चे रुग्ण वाढल्याने Hyderabad मधील मांसविक्री करणाऱ्यांना सूचना

Q Fever Cases In Hyderabad: या ठिकाणी चाचणी करण्यात आलेल्या 250 जणांपैकी पाच जणांना क्यू फीव्हरचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं असून हे पाचही जण मांस विक्री व्यवसायाशी संबंधित आहेत.

Updated: Jan 27, 2023, 08:08 PM IST
कत्तलखान्यांपासून दूर राहा! Q Fever चे रुग्ण वाढल्याने Hyderabad मधील मांसविक्री करणाऱ्यांना सूचना title=
Q Fever Cases (File Photo)

Q Fever Cases In Hyderabad: सन 2020 मध्ये चीनमधील वुहानमध्ये ज्या पद्धतीने मांसविक्री केंद्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता तसाच काहीचा प्रकार सध्या हैदराबादमध्ये (Hyderabad) क्यू फीव्हरबद्दल झाल्याने एकच खळबळ उढाली आहे. देशात कोरोनाचा प्रकोप अद्याप पूर्णपणे संपलेला नाही असं असतानाच आता नव्या आजारामुळे दहशत निर्माण झाली आहे. हैदराबादमध्ये क्यू फीव्हरचे अनेक रुग्ण (Q Fever Cases) आढळून आले आहेत. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने शहरातील मांसविक्री करणाऱ्यांना कत्तलखान्यांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हैदराबादमधील नॅशनल रिचर्स सेंटर ऑन मीट म्हणजेच एनआरसीएने सीरओलॉजिकल चाचण्या केल्या आहे. या चाचण्यामध्ये 250 मांसविक्री करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाचजणांना क्यू फीव्हरची (Q Fever) लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कत्तलखान्यांमध्ये जाऊ नका

एनआरसीएमने असंही म्हटलं आहे 5 टक्क्यांहून कमी नमुन्यांमध्ये साइटाकोसिस आणि हेपेटायटिससारख्या अन्य रोगांचे जनुकीय अंश आढळून आले. साइटाकोसिस एक संसर्गजन्य रोग आहे जो पोपटांसारख्या पक्षांकडून मानवामध्ये संक्रमित होतो. एनआरसीएम च्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये नागरिक प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहे. अधिकाऱ्यांनी संसर्ग झालेल्या मांसविक्री करणाऱ्या व्यक्तींनी कत्तलखान्यात जाऊ नये, संसर्ग झालेल्यांनी कत्तलखान्यांपासून दूर रहावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच त्यांना अॅडव्हास डायग्नोस्टिक टेस्ट करण्यासही प्रशासनाने सांगितलं आहे.

क्यू फीव्हर म्हणजे काय?

क्यू फीव्हर एक बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारा संसर्गजन्य तापाचा प्रकार आहे. हा संसर्ग बकऱ्या, गाय आणि बोकड्यांच्या माध्यमातून होतो. कॉग्निजला बर्नेटी नावाच्या बॅक्टेरियामुळे हा संसर्ग होतो. संसर्गजन्य जनावरांच्या संपर्कात आल्यास श्वसनमार्गिच्या माध्यमातून हा संसर्ग होतो. क्यू फीव्हरचा ससंर्ग झाल्यानंतर दिसणारी लक्षणं ही सामन्य तापासारखीच आहेत. यामध्ये ताप येणं, थंडी वाजणे, चक्कर येणं, सांधेदुखी यासारखी लक्षणं दिसून येतात. 

तज्ज्ञ काय म्हणतात?

ग्रेटर हैदराबाद नगर पालिकेचे (जीएचएमसी) मुख्य पशु चिकित्सा अधिकारी अब्दुल वकील यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण मोजक्या मांस विक्री करणाऱ्या लोकांनाच संसर्ग झाला आहे. "ज्या पद्धतीने मांसविक्री करणारे लोक या प्राण्यांच्या संपर्कात येतात त्याच माध्यमातून हवेवाटे किंवा थेट संपर्कामुळे या लोकांना संसर्ग झाला आहे. हा एक संसर्गाचा सामान्य प्रकार आहे. संसर्ग झाल्यानंतर  शरीरामध्ये अॅण्डीबॉडी तयार होतात," असं अब्दुल यांनी सांगितलं.

अर्थात याचा अर्थ एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होणार नाही असं नाही. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता कायम असते. एनआरसीएनच्या एका वैज्ञानिकाने आम्ही या भागातील लोकांच्या चाचण्या करणार असल्याचं सांगितलं.