"कपडे फाडून छातीवर..."; पोलीस स्टेशनमधील छळाबद्दल 'त्या' महिलेचा खळबळजनक दावा

Punjab Crime : चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिलेवर पोलिसांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आठवडाभर महिलेवर अत्याचार सुरु असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Updated: Jul 9, 2023, 11:42 AM IST
"कपडे फाडून छातीवर..."; पोलीस स्टेशनमधील छळाबद्दल 'त्या' महिलेचा खळबळजनक दावा title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : पंजाबमधील (Punjab Crime) गुरुदासपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) एका महिलेला बेकायदेशीर कोठडीत डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेला पकडून तिच्यावर अत्याचार केल्याचाही दावा करण्यात आला  आहे. महिलेवर चोरीचा आरोप केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. महिलेवर सोने आणि रोकड चोरल्याचा आरोप केला होता. ही महिला एका बड्या अधिकाऱ्याकडे काम करायची. आपण चोरी केली नसल्याचे महिलेचे म्हणणे होते. मात्र पोलिसांनी तिला आठवडाभर बेकायदेशीररित्या कोठडीत ठेवले होते. पोलिसांनी यावेळी थर्ड डिग्रीचा (third degree) वापर केल्याचे महिलेनं म्हटलं आहे. पोलिसांनी दिवसरात्र मला मारहाण केली आणि लैंगिक अत्याचार केले, असा या पीडित महिलेचा आरोप आहे.

पीडितेला सुमारे एक आठवडा बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आले होते. पीडित महिला गुरुदासपूर शहर पोलीस स्टेशनचे एसएचओ गुरमीत सिंग यांच्या स्टाफ क्वार्टरमध्ये होती. यात दोन एएसआय मंगल सिंग आणि अश्वनी कुमार यांचाही सहभाग होता. पीडित महिला ही बड्या अधिकाऱ्याकडे मदतनीस म्हणून काम करत होती. प्रकृती बिघडल्यामुळे तिला गुरुदासपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालात तिच्या शरीरावर सात जखमांच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

"मी जिथे काम करायचे तिथल्या अधिकाऱ्याने 1 जुलै रोजी घरी बोलवलं होतं. त्यानंतर त्यांनी मला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यावेळी पोलिसांमध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. पोलिसांनी मला रात्रंदिवस मारहाण केली. माझे कपडे फाडले. माझ्या छातीवर विजेचे झटके देऊन माझा छळ केला," असा आरोप पीडित महिलेने माध्यमांसोबत बोलताना केला आहे. पोलिसांनी माझ्या आई आणि बहिणीला उचलून नेण्याची धमकी दिली होती. मी गुन्हा कबूल केला नाही तर त्यांचे कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी मारहाण करु असेही पोलिसांनी सांगितले होते.

"मंगल सिंग यांनी माझ्या छातीवर विजेचा झटका दिला.'दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली देण्यासाठी ते माझ्यावर दबाव टाकत होते. मी काहीही चोरले नसल्याने मी त्याला साफ नकार दिला. पोलिसांनी माझ्या घराचीही झडती घेतली, पण काहीही सापडले नाही," असेही पीडितेने सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी

दुसरीकडे गँगस्टर रोहित कुमार याने पंजाबमधील गुरुदासपूर येथे एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या चार पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रोहित कुमारने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रोहित कुमारवर गुन्हा दाखल केला आहे.