Lakhimpur Kheri Violence: नवज्योत सिंग सिद्धू यांचं धरणं आंदोलन, आरोपींच्या अटकेपर्यंत हटणार नाही

लखीमपूर खेरी इथं नवज्योतसिंग सिद्धू यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर ते उपोषणाला बसले

Updated: Oct 8, 2021, 10:22 PM IST
Lakhimpur Kheri Violence: नवज्योत सिंग सिद्धू यांचं धरणं आंदोलन, आरोपींच्या अटकेपर्यंत हटणार नाही title=

उत्तर प्रदेश : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Violence) धरणं आंदोलन सुरु केलं आहे. यादरम्यान सिद्धू यांनी मौन धारण केलं आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी सिद्धू यांनी आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Union minister Ajay Misra) यांचे पूत्र आशिष मिश्रा (Ashish Misra) यांना अटक करण्याची मागणी सिद्धू यांनी केली आहे. सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोपही सिद्धू यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह अनेक काँग्रेस नेते गुरुवारी पंजाबमधून लखीमपूरसाठी रवाना झाले. त्यांना सहारनपूर इथं ताब्यात घेण्यात आलं. काही तासांनंतर त्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी मिळाली. सिद्धू यांनी मृत शेतकरी आणि पत्रकार रमण कश्यप यांच्या कुटुंबाची लखीमपूर खेरी इथं भेट घेतली.

पत्रकार रमण कश्यप यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर सिद्धू म्हणाले, 'जोपर्यंत अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी इथे उपोषणाला बसणार आहे. यादरम्यान मी मौन धारण करणार आहे'.

रविवारी लखीमपूर खेरी इथं चार शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी समन्स बजावलं पण ते हजर झाले नाहीत. आशिष मिश्रा शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आशिष मिश्राच्या दोन जवळच्या साथीदारांना अटक केली आहे.