नवी दिल्ली : 'कोणी सोबत येईल की नाही, याची चिंता करू नका' असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या खासदारांना दिला आहे. शाह यांनी राज्यातल्या भाजप खासदारांची बैठक बोलावली होती. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत युती होईल की नाही याची चिंता न करता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश शाह यांनी दिलेत.
या बैठकीला महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री उपस्थित होते. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे, हंसराज अहिर, सुरेश प्रभू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. तसेच या बैठकीला राज्यसभा खासदार नारायण राणे हेसुद्धा उपस्थित होते.
देशात पाच राज्यांच्या निवडणुकीत हातातील तीन राज्यांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे पक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी तातडीने महाराष्ट्र राज्यातील खासदारांची दिल्लीत बैठक बोलावली. या बैठकीला खासदार नारायण राणेही उपस्थित होते.
महाराष्ट्रात भाजप - शिवसेना युती होणार की नाही, हे अजून निश्चित नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. कुणी सोबत येईल की नाही, याची चिंता करू नका. युती होईल का याची चिंता करू नका. सोबत कोणी नाही आले तरी सगळ्यांनी कामाला लागा, असा आदेश भाजप खासदारांना अमित शाह यांनी दिला.