नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडालीय.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
यावर बोलताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मीडियाशी बोलताना काही धक्कादायक खुलासा केलाय. 'मी गेल्या ३५ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कार्यभार जवळून पाहिलाय. अशी परिस्थिती कधीच आली नाही... आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की एखाद्या न्यायाधीशानं कोणत्या प्रकरणाची सुनावणी कोणता जज करेल हे ठरवलंय... आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे ठरवत आहेत की कोणता न्यायाधीश कोणत्या प्रकरणावर सुनावणी करणार' असं त्यांनी म्हटलंय.
'हे सर्व सरकारच्या इशाऱ्यावर केलं जातंय. कोर्टाची स्वतंत्रता संपतेय... सरन्यायाधीश (CJI) महत्त्वाची प्रकरणं खास न्यायाधीशांकडे सोपवत त्यांना बर्खास्त करून टाकतात. जेव्हा या पद्धतीच्या कामावर चार वरिष्ठ न्यायाधीशांनी हरकत घेतली तेव्हा त्यांना महत्त्व दिलं गेलं नाही. यामुळे चार वरिष्ठ न्यायाधीशांना मीडियासमोर जाण्याचं पाऊल उचलावं लागलं... ज्यामुळे सगळा देश जागा होईल' असं म्हणत प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचं म्हटलंय.
हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. सुप्रीम कोर्टाची स्वतंत्रता संपणं हे अतिशय चिंताजनक आहे. सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यायला हवा. कारण अशा परिस्थितीत स्वाभिमान असलेला कोणताही न्यायाधीश राजीनामा देईल... अन्यथा हे प्रकरण वाढत जाईल, असंही भूषण यांनी म्हटलंय.