नवी दिल्ली : भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचे विधान केल्याने त्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. बुधवारी लोकसभेतील वादविवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन बीलावर डीएमके खासदार ए राजा यांनी आपले मत मांडले. गांधीहत्येबद्दल गोडसेनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला.
ए राजा बोलत असताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्यांना अडवले. तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही असे साध्वी यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाने लोकसभेत गोंधळ निर्माण झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे हे विधान लोकसभा कार्यवाहीतून हटवण्यात आले आहे. प्रज्ञा सिंह यांच्यावर पक्ष कारवाई करु शकतो असे भाजप प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले. या वक्तव्यावरून पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले असता मी उद्या उत्तर देईन असे त्यांनी म्हटले.
साध्वी प्रज्ञासिंह यांची वादात अडकण्याची ही काही पहीलीच वेळ नाही आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती. आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती.
दरम्यान बाबरी मशीद वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आाहे. साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मी बाबरी मशीदीच्या वर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती असे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केले होते. निवडणूक आयोगाने तात्काळ आक्षेप घेत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली. मध्य प्रदेशचे मुख्य निर्वाचन अधिकारी वी एल कांता राव यांनी ही कारवाई केली होती.