मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. १८२ पैकी ९९ जागा जिंकून भाजप गुजरातमध्ये पुन्हा एकदा सत्ता काबीज करणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपनं १५० जागा जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यासाठी मिशन १५०ची घोषणाही करण्यात आली होती. पण भाजपच्या या स्वप्नांना काँग्रेसनं सुरुंग लावला.
८० जागा जिंकून काँग्रेसनं मोदींना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये तगडं आव्हान दिलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र गुजरातच्या निकालावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली असती तर काँग्रेसची कामगिरी आणखी चांगली झाली असती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता पण सरकारनं योग्यवेळी उचललेल्या पावलांमुळे व्यापाऱ्यांचा राग थोडा कमी झाल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरुवातीला आघाडी करण्याबाबत चर्चा झाली पण दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून वाद झाल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमदेवाराचा विजय झाला आहे. पोरबंदर कुटियाना या जागेवरून राष्ट्रवादीच्या कंधाल जडेजा यांचा विजय झाला आहे.