मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्भाग्य; प्रियंका- रॉबर्ट यांची पोस्टर उतरवल्याने काँग्रेस आक्रमक

भाजपकडून अनेक प्रकरणांमध्ये नाहक त्यांचे नाव गोवण्यात आले आहे.

Updated: Feb 6, 2019, 02:29 PM IST
मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्भाग्य; प्रियंका- रॉबर्ट यांची पोस्टर उतरवल्याने काँग्रेस आक्रमक title=

नवी दिल्ली:  दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंका गांधी यांची लावण्यात आलेली पोस्टर्स भाजपने उतरवल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्सवर प्रियंका गांधी यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही दिसत आहेत. मात्र, ही पोस्टर्स भाजपकडून परस्पर उतरवण्यात आली. यावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार गलिच्छ राजकारण खेळत असून काल रात्री त्यांनी परस्पर पोस्टर्स उतरवून टाकल्याचा आरोप काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी केला. यानंतर भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या कृत्याचे समर्थन केले. काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर दोन गुन्हेगारांची छायाचित्र होती. एक म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राहुल गांधी आणि दुसरे म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नुकतेच 'ईडी'च्या चौकशीला सामोरे गेलेले रॉबर्ट वढेरा. सांबित पात्रा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या संजय सिंग यांनी भाजपवर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांची पत्नी असूनही तिच्यासोबत त्यांचे पोस्टर्स लागत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. रॉबर्ट वढेरा हे प्रियंका गांधी यांचे पती आहेत. भाजपकडून अनेक प्रकरणांमध्ये नाहक त्यांचे नाव गोवण्यात आले आहे. मात्र, त्याचा एकही पुरावा अजून भाजपला सादर करता आला नाही. आज रॉबर्ट वढेरा यांना ज्याप्रकारे चौकशीला सामोरे जावे लागत आहे, उद्या नरेंद्र मोदी यांच्यावरही तशीच वेळ येईल, असे संजय सिंग यांनी सांगितले.