15 लाख खात्यात कधी जमा होणार? PMO नं दिलं उत्तर...

...त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं या आरटीआय अर्जावर दिलंय. 

Updated: Apr 24, 2018, 07:22 PM IST
15 लाख खात्यात कधी जमा होणार? PMO नं दिलं उत्तर...  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचं वचन दिलं होतं... ते वचन काही पूर्ण होण्याचं नाव घेईना... त्यामुळेच एका नागरिकानं चक्क माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करत '15 लाख खात्यात कधी जमा होणार?' असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान कार्यालय (PMO)नं उत्तरही दिलंय.

विचारला गेलेला प्रश्न आरटीआय कायद्यांतर्गत येत नाही... त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं या आरटीआय अर्जावर दिलंय. 

माहितीच्या अधिकारांतर्गत मोहन कुमार शर्मा या नागरिकानं 26 नोव्हेंबर 2016 रोजी एक अर्ज देऊन आपल्या प्रश्नावर उत्तर मागितलं होतं. हा अर्ज 1000 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून हटवण्याच्या - नोटाबंदीच्या घोषणनेनंतर जवळपास 18 दिवसांनंतर करण्यात आला होता.

मोदींनी नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये कधी टाकले जाणार, त्याच्या तारीखेबद्दल या आरटीआयमधून माहिती मागवण्यात आली होती. परंतु, यावर त्यांना काही उत्तर मिळालं नाही. 

त्यानंतर शर्मा यांनी मुख्य सूचना आयुक्त आर के माथुर यांच्याकडे आपल्याला आरटीआय अंतर्गत माहिती न मिळाल्याची तक्रार केली. त्यावर उत्तर देताना आरटीआय कायद्याच्या कलम 2 (एफ) अंतर्गत ही माहिती आरटीआय अंतर्गत येत नाही, असं प्रत्युत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलंय.