बीदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीदर कलबुर्गी रेल्वेमार्गाचे उदघाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
कर्नाटकातील बीदर-कलाबुर्गीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. हा रेल्वेमार्ग तीन वर्षात होणार होता त्याला वीस वर्ष लागल्याचाही उल्लेख केला.
लालफितीच्या कारभारामुळे अशा अनेक योजना रखडल्याकडेही पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. कर्नाटक बिदर प्रकल्पात साठ टक्के पुर्णत्वाचे काम हे भाजप सरकारने केल्याचे सांगताना त्यांनी काँग्रेस सरकारवरही टीका केलीय.
अडकवणे, लटकवणे आणि भटकवणे हीच काँग्रेस संस्कृती आहे. सरकारी योजना लांबवणे, त्यामध्ये खोडा घालणे आणि त्या भरकटवणे याशिवाय काँग्रेसने काहीही केले नाही अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजीर येथे येऊन मंजुनाथेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने अनेक चांगल्या योजना जाणीवपूर्वक लांबवल्या असा आरोप पंतप्रधानांनी केला.
यापूर्वी पैसा हा केवळ अधिकारी आणि नेत्यांच्या खिशात जायचा मात्र, आता पैसा थेट सामान्यांच्या हातात येऊ लागला आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.