'भारतातील हिंसाचार आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपण्यासाठी ट्रम्प यांची खुषमस्करी'

दोन्ही नेते एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Updated: Feb 24, 2020, 06:06 PM IST
'भारतातील हिंसाचार आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपण्यासाठी ट्रम्प यांची खुषमस्करी' title=

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (NRC) देशात सुरु असलेला हिंसाचार आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपला जावा, या हेतूनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा खुशामत केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी सोमवारी दिल्लीत 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, १ एप्रिलपासून देशात CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून अराजकता माजणार आहे. भारतात सुरु असलेला हा हिंसाचार दडपण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांची इतकी खुशामत केली जात आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले. 

#TrumpInIndia : 'त्या' वहीत ट्रम्प यांनी नेमकं काय लिहिलं?

तसेच भारत दौऱ्यावेळी ट्रम्प कोणताही करार करणार नाहीत. ते भारताला लुटण्याचे काम करणार आहेत. साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीवेळी ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांच्याऐवजी नरेंद्र मोदींना संदेश लिहला. यावरून दोन्ही नेते एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. 

#TrumpInIndia : 'शोले', 'डीडीएलजे'विषयी ट्रम्प काय म्हणाले ऐकलं का?

तत्पूर्वी आज सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांनी आधी साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात हजेरी लावली. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील, असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटले. यानंतर ट्रम्प ताजमहाल पाहण्यासाठी रवाना झाले. ताजमहाल पाहिल्यानंतर ट्रम्प थेट दिल्लीला रवाना होतील. यानंतर उद्या नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात औपचारिक चर्चा होईल. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून CAA वरुन सुरु असलेला हिंसाचार आणि भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच हे मुद्दे मोदींसमोर उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.