लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Updated: Apr 5, 2019, 07:41 AM IST
लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात... title=

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी ब्लॉगच्या माध्यमातून अखेर आपले मौन सोडले. या ब्लॉगमध्ये अडवाणी यांनी विरोधकांना देशद्रोही किंवा शत्रू समजण्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. साहजिकच यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ही अपेक्षा तंतोतंत खरी ठरली आणि मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या ब्लॉगसंदर्भात भाष्य केले. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अडवाणीजींनी भाजपच्या विचारांचा मूळ गाभा नेमकेपणाने लोकांसमोर मांडला. देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि सर्वात शेवटी स्वत:चा विचार, हाच भाजपचा मूलमंत्र आहे. भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आणि अडवाणी यांच्यासारख्या महान व्यक्तींना पक्षाला मजबूत केल्याचा मला अभिमान असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

लालकृष्ण अडवाणी यांनी ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भाजपच्या स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा ब्लॉग लिहला आहे. यामध्ये अडवाणी यांनी भाजपची आजवरची वाटचाल आणि पक्षीय संस्कृती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.  देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिल्याचेही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते. 

लालकृष्ण अडवाणी यांना वयोमर्यादाचे कारण देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. अडवाणी यांच्या गांधीनगर या मतदारसंघातून यंदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत. यावर अडवाणी यांनवी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, ब्लॉगमध्ये त्यांनी आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याद्दल गांधीनगरमधील मतदारांचे आभार मानले आहेत.