ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर दलाली प्रकरण, ईडीने पुरवणी आरोपपत्र केले दाखल

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर दलाली प्रकरणी ईडीने दिल्लीतल्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.  

Updated: Apr 4, 2019, 11:52 PM IST
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर दलाली प्रकरण, ईडीने पुरवणी आरोपपत्र केले दाखल title=

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर दलाली प्रकरणी ईडीने दिल्लीतल्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पुरवणी आरोपपत्रानुसार ए पी म्हणजे अहमद पटेल, तसेच फॅम म्हणजे फॅमिली असल्याचे क्रिश्चन मिशेलने कबुल केल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. तर मिशेलने श्रीमती गांधींचे नाव घेतले असून, आपण त्यांना १९८६-८७ पासून ओळखत असल्याचे मिशेलने कबुल केल्याचेही ईडीने म्हटले आहे. 

दुबईतून भारतात आणलेल्या क्रिश्चन मिशेल या ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातल्या दलालाच्या चौकशीच्या आधारे हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या दलालीत लष्करी अधिकारी, नोकरशहा, माध्यमं आणि सत्ताधारी पक्षातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लाच दिली गेल्याचे, ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे. या व्यवहारासाठी कित्येक भारतीय अधिकारी आणि नेत्यांना लाच देण्याचा क्रिश्चन मिशेल याच्यावर आरोप आहे. 

राहुल गांधी यांचाही इशारा 

निवडणुकीनंतर भाजपाच्या सगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येईल आणि चौकीदार तुरुंगात असेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. नागपुरात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या मतदारसंघात कस्तुरचंद पार्क इथं राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राफेल, कर्जमाफी, नोटाबंदी यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसची गरीबांसाठीची ७२ हजार ही योजना अर्थतज्ज्ञांशी चर्चा करूनच जाहीर करण्यात आल्याचं सांगताना हा गरिबीवरील काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय. चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसावं आणि विदर्भाला सिंगापूर, दुबईसारखं हब बनवायचं होतं. मात्र भाजपा सरकारने काहीही केलं नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. महिलांना नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणार असल्याचं आश्वासनही राहुल गांधींनी या सभेत दिले आहे.