प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कदापी माफ करणार नाही- नरेंद्र मोदी

समाजाच्यादृष्टीने हे अत्यंत वाईट वक्तव्य आहे.

Updated: May 17, 2019, 05:05 PM IST
प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कदापी माफ करणार नाही- नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली: नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या वक्तव्यासाठी मी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना कदापी माफ करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शुक्रवारी न्यूज २४ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य हे अत्यंत वाईट होते. समाजाच्यादृष्टीनेही ते चुकीचे आहे. या सगळ्या प्रकारानंतर साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना कधीच पूर्णपणे माफ करू शकत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 

तत्पूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीदेखील साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. हे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी सार्वजनिक जीवनातील भाजपची प्रतिष्ठा आणि विचारधारेच्या दृष्टीकोनातून पक्षाने हे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याशिवाय नलीन कटील आणि अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचीही शिस्तपालन समितीकडून चौकशी केली जाणार आहे. येत्या १० दिवसांत शिस्तपालन समिती याचा अहवाल पक्षाला सादर करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी नमती भूमिका घेत माफीही मागितली होती.