जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींची नागरिकांना विनंती

पंतप्रधान मोदींंचं जनतेला आवाहन...

Updated: Mar 22, 2020, 07:23 AM IST
जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींची नागरिकांना विनंती title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या चार शहरांमध्ये लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमधील सरकारने ह़ॉटेल, सलून, मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण यानंतर मोठ्या प्रमाणात लोकं आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. जे चिंतेचं कारण बनलं आहे. कारण यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. मुंबईतून मोठ्या प्रमाणात रेल्वेने लोकं प्रवास करुन आपल्या गावी जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आहे तेथेच थांबवण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. याला अनेकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचे ठरवले आहे. कारण कोरोनाच्या विरोधात लढायचे असेल तर सध्या हाच एक उपाय आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आज पुन्हा जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'जनता कर्फ्यू सुरु होत आहे. माझी विनंती आहे की सर्व नागरिकांनी या देशव्यापी अभियानाचा भाग बनलं पाहिजे आणि कोरोनाच्या विरोधातील लढाई यशस्वी केली पाहिजे. आपला संयम आणि संकल्प या महामारीचा पराभव करेल.'

याआधी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना ज्या शहरात आहेत तेथेच राहण्याचं आवाहन केलं होतं. रेल्वे स्थानक, विमानतळावर येऊन काही जण स्वत:च्या आरोग्या सोबत खेळत आहेत. कृपया आपली आणि आपल्या कुटुंबाची चिंता करा. गरज असले तरच घराच्या बाहेर पडावे. तरच आपण याला रोखू शकतो.'