नवी दिल्ली : देशात आता कोरोना रुग्णांच्या वाढीला वेग आला आहे. दररोज सुमारे 10,000 नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या सध्याच्या संसर्गाची गती आणि भविष्यातील तयारीची स्थिती याबाबत पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी ज्या राज्यांमध्ये व प्रदेशात कोरोना प्रकरणात वाढ झाली आहे तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -१९ साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूच्या साथीच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरील स्थिती आणि भविष्यातील तयारी याचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील दोन महिन्यांच्या तयारीचा आढावा घेतला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून आपत्कालीन योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाला पावसाळा सुरू होण्याच्या दृष्टीने तयारीची खात्री करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, दिल्लीसह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, आयसीएमआरचे महासंचालक आणि इतर संबंधित लोकांचा समावेश होता.
पाच राज्यांत दोन तृतीयांश प्रकरणे
या बैठकीत कोरोनाबाबत अहवाल सादर करण्यात आला. ज्यामध्ये असे सांगितले गेले की, देशातील कोरोनाचे दोन तृतीयांश प्रकरणे पाच राज्यात आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. त्याचबरोबर पीएम मोदी यांनी दिल्लीतील सद्यस्थितीवरही चर्चा केली. बैठकीत गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना दिल्ली सरकार, दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी आणि उपराज्यपाल यांच्यासमवेत बैठक घेण्यास सांगितले आहे.