वाराणसीत हे २ उमेदवार देणार पंतप्रधान मोदींना टक्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Updated: Apr 26, 2019, 12:35 PM IST
वाराणसीत हे २ उमेदवार देणार पंतप्रधान मोदींना टक्कर title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात वाराणसीमध्ये सपा-बसपाच्या शालिनी यादव आणि काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत. याआधी वाराणसीमधून काँग्रेसकडून प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती. पण काँग्रेसने नंतर अजय राय यांच्या नावाची घोषणा केली. 

कोण आहेत शालिनी यादव?

शालिनी यादव काँग्रेसच्या माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची सून आहे. शालिनी यादव यांनी २२ एप्रिलला समाजवादी पक्षात प्रवेश केला. शालिनी यादव यांनी म्हटलं की, अखिलेश यादव यांची कार्यशैलीशी प्रभावित झाल्याने त्यांनी सपामध्ये प्रवेश केला. शालिनी यादव यांनी बनारस हिंदू यूनिवर्सिटीमधून आपलं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे. त्यांच्याकडे फॅशन डिजाइनिंगची डिग्री देखील आहे. शालिनी यादव यांनी याआधी २०१७ मध्ये वाराणसीच्या महापौरपदासाठी देखील नशीब आजमावलं होतं. पण त्यांचा पराभव झाला होता. शालिनी यादव यांचे सासरे श्‍यामलाल यादव यांनी १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवती वाराणसीमधून विजय मिळवला होता.

कोण आहेत अजय राय?

१९ ऑक्टोबर १९६९ ला वाराणसीमध्येच जन्म झालेले अजय राय हे लागोपाठ ५ वेळा आमदार आहेत. १९९६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २००७ पर्यंत ते आमदार होते. त्यानंतर त्यांना समाजवादी पक्षात प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे मुरली मनोहर जोशी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी पिंडरा येथे पोटनिवडणुकीत विजय मिळवत आमदार झाले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. अजय राय हे स्वबळावर निवडणूक लढवतात अशी त्यांची ओळख आहे. भूमिहार समाजात त्यांचं वर्चस्व आहे.

वाराणसीतील जातीची समीकरण

वाराणसी लोकसभा मतदारसंघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. ज्यामध्ये २ लाख कुर्मी, १ लाख यादव, २.५ लाख मुस्लीम, ७० हजार राजपूत, २ लाख बनिया वोटर आहेत. सोबतच जवळपास १.५ लाख भूमिहार आणि २ लाख ब्राह्मण मतदार देखील आहेत. कुर्मी समाजाच्या मतांना येथे महत्त्व आहे. वैश्य, यादव आणि मुस्लीम मतदारांची मतं येथे निर्णायक असतात.

२०१४ मध्ये कोणाला किती मतं?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण ५६.३७ टक्के मतं मिळाली होती. आपला २०.३० टक्के, काँग्रेसला ७.३४ टक्के तर बसपाला ५.८८ आणि सपाला ४.३९ टक्के मतं मिळाली होती.