नवी दिल्ली : दोनहून अधिक मुले असणाऱ्यांना यापुढे निवडूक लढवता येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूकीती उभे राहणाऱ्या उमेदवारांना दोन मुलांचा नियम लागू करावा अशी मागणी यातून करण्यात आली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य करावी आणि दोनहून अधिक मुले असलेल्यांना निवडणूकीत उभे राहण्याची परवानगी नाकारावी असेही यात म्हटले आहे.
या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत होऊ शकते. सरकारी नोकरी, सहायत्ता तसेच सबसिडीसाठी दोन मुलांचा नियम अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित राज्य स्तरावर हा कायदा लागू करुन गरजेचे बदल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजप नेता आमि वकील अश्वनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांचा निवडणूक लढण्याचा अधिकार काढून घ्यावा तसेच त्याचे संविधानिक अधिकारही काढून घेण्यात यावेत असेही म्हटले आहे.
योग गुरू रामदेव बाबा यांनी देखील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. वाढत्या लोकसंख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्यांना दोनहून अधिक मुले आहेत त्यांना मताचा अधिकार आणि सरकारी नोकरी दिली जाऊ नये असे त्यांनी म्हटले होते. देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्याच्या दृष्टीने त्यांनी चिंता व्यक्त केली होती. देशाची वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी दोनहून अधिक मुले असलेल्यांना मताधिकार, सरकारी नोकरी आणि वैद्यकीय सुविधा दिल्या जाऊ नयेत असे त्यांनी म्हटले होते. मग तो हिंदू असो वा मुस्लिम..त्याचा धर्म पाहीला जाऊ नये. यामुळेच लोकसंख्येवर अंकुश बसेल असे त्यांनी सुचवले होते. अशा लोकांना निवडणूक लढायला द्यायला नको. सरकारी शाळेत त्यांना प्रवेश नाकारायला हवा. सरकारी रुग्णालयात उपचार आणि सरकारी नोकरी त्यांना मिळू नयेत असेही रामदेव बाबा यांनी म्हटले होते.