रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : संसद भवनात आजपासून प्लास्टिकचे साहित्य वापरता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेत प्लास्टिक बंदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने प्लास्टिक बॉटल आणि अन्य प्लास्टिक साहित्याच्या वापरावर बंदी घालण्याबाबत अमलबजावणी केली. संसदेतील सर्व विभाग आणि कर्मचा-यांना पर्यावरण पुरक साहित्य आणि पिशवी वापरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर पासून सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंदी सक्तीची असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर प्लास्टिक विरुद्ध देशव्यापी मोहीम राबवणार येणार असल्याची घोषणा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. पंतप्रधान मोदी देशभरात प्लास्टिक बंदीची घोषणा करणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
याआधी महाराष्ट्रातही प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.