Job News : नोकरी कोणतीही असतो, त्यावर रुजू होण्यापूर्वी काही प्रक्रियांमधून आपल्याला पुढे जावं लागतं. लेखी चाचणी असो किंवा मग प्रत्यक्ष मुलाखतीची फेरी असो. नोकरीसाठी मेहनत घेत ती मिळवण्यासाठी अथक परिश्रम करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. कमालीच्या मेहनतीनंतरही नोकरी न मिळाल्यामुळं या मंडळींचा होणारा हिरमोडही तुम्ही पाहिला असेल. सध्या अशीच एक तरुणी तिच्या अपयशामुळं चर्चेचा विषय ठरत आहे.
बरं, सहानुभूती मिळण्याऐवजी तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला गेला आहे. कारण, आपल्या गोऱ्या (उजळ) वर्णामुळंच नोकरी नाकारल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट तिनं केली आहे. तिची ही पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी हा बनाव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
LinkedIn या सोशल मीडिया माध्यमावर बंगळुरूच्या Pratiksha Jichkar नं एक पोस्ट लिहिली. जिथं आपण उजळ वर्णामुळं नोकरी मिळवण्यास पात्र ठरलेलो नाही, असा दावा करणारी पोस्ट लिहिली. बरं, या पोस्टमध्ये तिनं एक स्क्रीनशॉटही जोडला जिथं ज्या संस्थेनं तिला नोकरी नाकारली त्यांच्याकडून आलेल्या नकाराच्या ईमेलचा संदर्भ तिनं जोडला आहे.
मुळ मुद्दा असा, की वर्ण गोरा आहे म्हणून नोकरी नाकारली हे असं काहीतरी घडण्याची ही पहिलीच वेळ असावी. किंबहुना या तरुणीनं केलेला दावा पाहता अशी वागणूक कोणतीही कंपनी किंवा कोणीही HR देत नाही असाच सूर अनेकांनी आळवला. बरं, इथं संशयाची बाब म्हणजे प्रतीक्षानं ही पोस्ट लिहीत असताना त्यावरील कमेंट करण्याची सुविधा बंद ठेवली होती. त्यामुळं तिला नेमका काय हेतू साधायचा होता हेच अनेकांच्या लक्षात येईना.
मुळात जेव्हा एखादी कंपनी त्यांच्या संस्थेतील पदासाठी आपल्याला अपात्र ठरवते तेव्हा हे सांगण्यासाठीही अधिकृत उत्तर दिलं जातं. इथं मात्र उत्तरासाठीची भाषा आणि त्यातही वर्णाचा उल्लेख हे सारंकाही पचनी पडणारं नाही. त्यामुळं अनेकांनी तर तिनं हे सर्वकाही प्रसिद्धीखातर केल्याचं म्हणत नाराजीचा तीव्र सूर आळवला. आता हा रोष पाहून प्रतीक्षा नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.