एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर...

One Side Love Story: एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 12, 2023, 11:38 AM IST
एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर... title=

One Side Love Story: एकतर्फी प्रेमाचा शेवट वाईट झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण सनकी प्रियकरामुळे पटनामध्ये एकतर्फी प्रेमाचा अंत धक्कादायकरित्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही चूक नसताना अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पटनाच्या मसौरी येथे एका 17 वर्षीय मुलीची भरदिवसा हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. कारण फक्त एवढंच होतं की तिने एका विक्षिप्त प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. इतक्या साध्या गोष्टीसाठी त्या सनकी तरुणाने तिला दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या. अनामिका कुमारी असे तरुणीचे नाव आहे.

एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याच्या वृत्ताला स्थानिकांनी दुजोरा दिला आहे. सनकी तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला अनामिका कुमारी वारंवार नकार देत होती. पण तो तरुण वारंवार तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता. अपेक्षाभंगातून आलेल्या रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने सोमवारी त्या तरुणाने दिवसाढवळ्या तिची हत्या केली. हत्या करुन झाल्यावर तरुणाने तेथून पोबारा ठोकला.

अनामिका कुमारी दररोजप्रमाणे काजीचक गावातून कोचिंगसाठी येत असे. सोमवारी अनामिका कुमारी माणिकचंद वळणावर आली असता तरुण अनामिकाजवळ आला. यानंतर रस्त्यातच दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. या वादानंतर तरुणाला संताप अनावर झाला. तरुणाने कमरेतील पिस्तूल काढली आणि अनामिकावर गोळी झाडली. 

अनामिकाच्या डोक्यात गोळी लागली. घटनेनंतर मारेकरी तेथून पळून गेला. आजूबाजूला लोकांचा जमाव जमला. लोकांनी या घटनेची माहिती मसौरी पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच मसोधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय कुमार आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अनामिकाचा मृतदेह तात्काळ रुग्णालयात दाखल केला, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. फरार प्रियकराच्या शोधासाठी छापे टाकले जात असल्याची माहिती मसौरी पोलिस ठाण्याचे प्रभारी संजय कुमार यांनी दिली. 

पोलिसांनी अनामिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपविभागीय रुग्णालयात पाठवला. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून मारेकऱ्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.