Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयक गुरुवारी लोकसभेमध्ये आवाजी मतदाने मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. शाह यांनी विरोधकांना लक्ष्य करत, स्वार्थी राजकारणासाठी विरोधक एकत्र आले आहेत. मात्र दिल्लीमधील नियुक्त्या आणि बदल्यांबाबत अध्यादेशाची जागा घेणारा कायदा मंजूर झाल्यानंतर विरोधकांची महाआघाडी कोसळेल असा दावाही शाह यांनी केला. आपल्या राज्यातील विधानसभेचं अधिवेशनच न घेणारा राजकीय पक्ष तुम्ही पाहिला आहे का? असा सवाल अमित शाह यांनी विचारला. दिल्ली असा केंद्र शासित प्रदेश आहे ज्याच्या विधानसभेचं काम कायमच सुरु असतं असंही शाह म्हणाले. दरम्यान अमित शाहांचं भाषण सुरु असतानाच एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी एक प्रतिक्रिया दिली. त्यावर अमित शाहांनी दिलेलं उत्तर ऐकून संपूर्ण सभागृह हसू लागल्याचं पाहायला मिळालं.
शाह यांनी विरोधी पक्षांनाही तुम्ही कोणाला समर्थन करत आहात हे एकदा तपासून पाहा असंही म्हटलं. आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर टीका करताना शाह यांनी मंत्रीमंडळाच्या अधिकारांबद्दल बोलणाऱ्या पक्षाने 2020 नंतर केवळ एकदाच अधिवेशन बोलावलं आहे आणि ते सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, असा टोला लगावला. 2021 नंतर एकच अधिवेशन भरवलं आणि ते सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, असंही शाह म्हणाले. शाह यांनी आकडेवारी वाचून दाखवत, 2022 मध्ये या पक्षाने एकही अधिवेशन भरवलं नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावलं कारण अर्थसंकल्प संमत करायचा होता. 2023 मध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने एकदाच अधिवेशन बोलावलं. ते सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनच होतं. अधिकारांबद्दल बोलणारे हे लोक कोणत्या अधिकारांबद्दल बोलत आहेत, असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
अमित शाह हे भाषण देत असताना असदुद्दीन ओवैसी यांनी मागून काहीतरी प्रतिक्रिया दिली. त्यावर अमित शाह यांनी त्यांच्याकडे पाहत तुम्ही चुकत आहात असं म्हटलं. यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असलेल्या ओवैसींनी अमित शाह यांना, "मी कोणत्या टीममध्ये आहे?" असा प्रश्न विचारला. त्यावर, "ओवैसीजी, माझी इच्छा तर अशी आहे की मी स्वत:ची टीम तयार करावी. तुमचे मुद्दे फारच वेगळे आहेत," असं उत्तम अमित शाहांनी दिलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.