संसद भवनात कोरोना रुग्णांचा विस्फोट, एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात

कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण   

Updated: Jan 9, 2022, 12:41 PM IST
संसद भवनात कोरोना रुग्णांचा विस्फोट, एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता राजधानी दिल्लीत असलेल्या संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत काम करणाऱ्या जवळपास 400 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

6 आणि 7 जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यामध्ये 400 हून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, प्रत्येकाने काळजी घेण्याची  गरज आहे. 

मुंबई प्रमाणे राजधानी दिल्लीत देखील रोज जवळपास 20 हजारांपेक्षा लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सरकारने त्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी दिल्लीतर 20 हजार 181 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 

शनिवारी झालेली रुग्णवाढ ही गेल्या आठ महिन्यांच्या तुलनेत फार मोठी आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन 14 रुग्णालयात बेड्सची संख्या 4 हजार 350 वरून 5 हजार 60 केली आहे. तसेच रुग्णालयातील आयसीयू बेड्स वाढवून 2 हजार 75 केले आहेत.