श्रीनगर : श्रीनगरमधील सेंट्रल जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
या जेलमध्ये बसुन कैदी दहशतवादी कारवाया करत आहेत. एनआयएने टाकलेल्या छाप्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने सोमवारी कारागृहात छापा टाकला. या छापेमारीत एनआयएने जवळपास दोन डझनहून अधिक मोबाईल फोन्स, जिहादी साहित्य, पाकिस्तानचे झेंडे आणि डेटा हार्डवेअर जप्त केले आहेत.
एनआयएच्या २० पथकांनी या हाय सिक्युरिटी असलेल्या कारागृहात छापेमारी टाकली. या टीमच्या मदतीसाठी एनएसजी कमांडो आणि ड्रोन्सही लावण्यात आले होते. याच कारागृहात काही दहशतवादीही आहेत त्यापैकी काही पाकिस्तानमधीलही आहेत.
25 mobile phones, some SIM cards, 05 SD cards, 05 pen drives, 01 iPod and large number of incriminating documents/articles including a poster of Hizbul-Mujahideen and a Pakistani flag were seized during NIA searches at Central Jail in Srinagar. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 12, 2018
एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, दानिश गुलाम लोन आणि सोहेल अहमद भट यांच्या अटकेनंतर चौकशी संदर्भात कारागृहाची तपासणी करण्यात आली. या दोघांनी दावा केला होता की, दहशतवाद्यांची एक टीम हत्यारांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येत आहे आणि याची संपूर्ण योजना कारागृहात बनवण्यात आली होती.
एनआयएने कारागृहाची तपासणी सोमवारी पहाटे सुरु केली आणि दुपारपर्यंत सुरु होती. या कामात मेटल डिटेक्टर्सचीही मदत घेण्यात आली. एनआयएच्या टीम्ससोबत मॅजिस्ट्रेट, साक्षीदार आणि डॉक्टरही उपस्थित होते. तसेच संपूर्ण कारवाई दरम्यान ड्रोनने नजर ठेवण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने टाकलेल्या धाडीत २५ मोबाईल फोन, काही सिमकार्ड, पाच सुरक्षित डिजिटल कार्ड, पाच पेन ड्राईव्ह, एक आयपॉड आणि इतरही साहित्य जप्त करण्यात आलं. यासोबतच हिज्बुल मुझाहिद्दीनचे पोस्टर, पाकिस्तानी झेंडे, जिहादी साहित्य जप्त करण्यात आले.
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर सीआयडीच्या रिपोर्टने खुलासा केला की, श्रीनगरमधील कारागृह हे दहशतवाद्यांची भरती करण्याचं एक केंद्र बनलं आहे.