Gautam Adani Row: अमेरिकेतील hindenburg अहवालानं गौतम अदानी यांच्या नाकी नऊ आणले. कोट्यवधींच्या संपत्तीचा डोलारा क्षणात डगमगताना दिसला. (Gautam Adani net worth) अदानींच्या शेअर्समध्ये जणू भूकंपच आला. इतका मोठा की, त्यांना तातडीनं (FPO) एफपीओसुद्धा रदद् करावा लागला. परिणामस्वरुप गौतम अगानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले. हा अहवाल सादर केला जाण्यापूर्वी ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर होते. पण, त्यानंतर मात्र अदानी साम्राज्याचं चित्रच बदललं.
अदानी समुहाकडून मात्र हिंडनबर्ग अहवालातील सर्व दावे फेटाळण्यात आले. आठवड्याभरातच या समुहाकडून पुन्हा एकदा शेअर बाजारात उल्लेखनीय Come Back पाहायला मिळालं. असंच काहीसं संकट (Reliance) रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक, आणि देशातील दिग्गज व्यावसायिक धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्यावर ओढावलं होतं. ज्यावर त्यांनी आपल्याच शैलीत मात करत पुन्हा दुपटीच्या वेगानं प्रगतीची वाट धरली होती. कायमच मोठी ध्येय्य नजरेसमोर ठेवणं हा जणू त्यांचा स्वभावच होता.
18 मार्च 1982 हा तोच दिवस होता जेव्हा मुंबई शेअर बाजारात हाहाकार माजला होता. 1977 मध्ये धीरुभाई यांनी रिलायन्स या आपल्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रिलायन्सकडून 10 रुपये प्रती शेअर या दरानं 28 लाख इक्विटी शेअर्स जारी केले गेले. इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) पासून या शेअर्सच्या विक्रीची सुरुवात झाली. वर्षभराच्या आतच रिलायन्सच्या शेअर्सची किंमत पाचपट वाढली होती. 1980 मध्ये शेअर्स 104 आणि 1982 मध्ये 18 टक्क्यांनी वाढून 186 रुपयांवर पोहोचले. अदानींच्या शेअर्ससोबतही काहीसं असंच झालं. धीरुभाई अंबानी यांनी त्यानंतर डिबेंचर्सच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी बेत आखला. थोडक्यात त्यांनी कर्जरोखानं पैसे गोळा करण्याचा मार्ग अवलंबण्याचं ठरवलं.
धीरुभाई त्यांची खेळी खेळत असतानाच तिथं कोलकाता शेअर मार्केटमध्ये असणाऱ्या काही दलालांनी रिलायन्सच्या शेअर्सना पाडण्यासाठी कट रचला. यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले जाऊ लागले. उतरती कळा लागलेल्या रिलायन्सच्या शेअर्सना कुणी खरेदी करणार नाही अशी आशा दलालांना होती. त्यातच कंपनी स्वत:चे शेअर खरेदी करु शकत नाही, असाही नियम त्यावेळी होता. या सर्व परिस्थितीमध्ये धीरुभाई नवखे आहे असा गैरसमज दलालांच्या मनात घर करु लागला होता.
रिलायन्सचे शेअर पाडण्यासाठी दलालांनी शॉर्ट सेलिंग सुरु केली. ब्रोकरेजवर उधार स्वरुपात घेतलेल्या शेअर्सची (reliance share price) किंमत कमी झाल्यानंतर ते खरेदी करुन परतवायचे आणि मोठा नफा कमवायचा असा कट दलाल रचत होते. यानुसार जवळपास अर्ध्या तासात दलालांनी जवळपास साडेतीन लाथ शेअर्स शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून विकले. ज्यामुळं रिलायन्सच्या शेअरची किंमत 131 वरून 121 रुपयांवर आली.
धीरुभाईंना दलालांच्या या कटाची चाहूल लागली आणि त्यांनी इथं त्यांच्याच काही दलालांना रिलायन्स टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तयार केलं. आता खरा खेळ सुरु झाला होता. एकिकडे (Kolkata share market) कोलकात्यामध्ये बसून दलाल (Bombay Stock Exchange) मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचे शेअर विकत होते आणि दुसरीकडे अंबानींचे दलाल हे शेअर्स विकत घेत होते. स्वाभाविकपणे या शेअर्सची किंमत पडण्याऐवजी वाढत गेली आणि 125 रुपयांवर पोहोचली.
शेअर्सच्या या खरेदीविक्रीमध्ये रिलायन्सचे 11 लाख शेअर विकले गेले. ज्यामध्ये 8 लाख 57 हजार अंबानींच्याच दलालांनी खरेदी केले होते. कोलकात्यात बसलेल्या दलालांच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना घडल्यानंतर आलेल्या शुक्रवारी अंबानींच्या दलालांनी कोलकाता येथे असणाऱ्या दलालांकडून शेअर मागितले. त्यावेळी 131 रुपयांना तोंडी शेअर विकणाऱ्यांची अवस्थाच वाईट होती कारण, तोपर्यंत शेअर्सच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. बरं जास्तीची वेळ मागावी तर दलालांना जास्तीचे 50 रुपये प्रती शेअर भरावे लागले असते.
धीरुभाई आता खऱ्या अर्थानं सक्रीय झाले होते. त्यांनी दलालांना वेळ द्यायला नकार दिला. नाईलाजानं त्यांना रिलायन्सचे शेअर चढ्या दरात खरेदी करत परत करावे लागले. हे प्रकरण त्यावेळी इतकं गाजलं की शेअर मार्केट तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. हे तेच वळण होतं जिथून धीरुभाई अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स उद्योग समुहानं मागे वळून पाहिलंच नाही. या एका घटनेमुळं धीरुभाईंवर गुंतवणूकदारांचा विश्वास बसला आणि ते या शेअर मार्केटचे राजा म्हणूनच नावाजले गेले.