नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचं सावट आहे. देशातील समस्त नागरिक या धोकादायक विषाणूच्या दहशतीखाली जगत आहे. दरम्यान अनेक ठिकाण्याहून कोरोनामुळे आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. तर पंजाबमध्ये देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आल्यामुळे एका वद्ध महिलेने आत्महत्या केली. ही महिला ६५ वर्षांची होती. परंतु शवविच्छेदनानंतर तिला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
पंजाबच्या खुर्मापूर येथे राहणाऱ्या संतोष कौरने कोरोनाला घाबरून आत्महत्या केली आहे. पोलिसांना या बातमीचा सुगावा लागताच ते घटनास्थळी पोहोचले. संतोष कौरला चार मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा घसा खराब होता. त्यावर औषध देखील सुरू होते. घसा खराब असल्यामुळे आपण कोरोना बाधित आहोत असा संशय संतोषला आला.
कोरोना बाधित असल्याच्या संशयामुळे ती शेजारच्या महिलांपासून देखील दूर राहत होती. आत्महत्ये पूर्वी तिने आपल्या मोठ्या मुलीसोबत फोनवरून संवाद देखील साधला होता. परंतू त्यानंतर तिने फोन उचललाच नाही. जेव्हा शेजारच्या मंडळींचा फोन आल्यानंतर चारही मुलींना आपल्या आईने आत्महत्या केल्याची बातमी मिळाली.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर ६५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना नसल्याचं निष्पन्न झालं. तर विषारी पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.