कुणाचं डोकं, कुणाचे हात - पाय नव्हते, पण....; दु:ख विसरून प्रवाशाने वाचवला 2 वर्षाच्या मुलाचा जीव

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन पॅसेंजर ट्रेनमध्ये आणि मालगाडी शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात किमान 280 लोक मरण पावले आणि 900 हून अधिक जखमी झाले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jun 3, 2023, 12:49 PM IST
कुणाचं डोकं, कुणाचे हात - पाय नव्हते, पण....; दु:ख विसरून प्रवाशाने वाचवला 2 वर्षाच्या मुलाचा जीव title=

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 900 लोक जखमी झाले आहेत. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस (bangalore howrah superfast express) आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस (coromandel express) या दोन पॅसेंजर ट्रेन आणि एक मालगाडी यांच्यामध्ये हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातानंतर भारतीय लष्करासह बचवा पथकाने जखमींना ट्रेनबाहेर काढलं आहे. मात्र त्याआधी अपघातग्रस्त रेल्वेतील प्रवासी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढत मोठा अनर्थ टळण्यापासून वाचवल्याचे समोर आले आहे. 

या भीषण अपघातातील एका प्रवाशाने सांगितले की या घटनेच्या वेळा तो झोपला होता आणि मोठा आवाज झाल्यानंतर 10-15 लोक त्याच्यावर पडले तेव्हाच मला जाग आली. दुसरीकडे, या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या लोकांनी कशाचाही पर्वा न करता इतर प्रवाशांची मदत करण्यास सुरुवात केली होती. शालिमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये हे प्रवासी होते. अपघातानंतर या प्रवाशांनी इतर प्रवाशांना खूप मदत केली. तसेच एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला.

"आम्ही शालीमारवरुन ट्रेन पकडली होती. अपघात झाला त्यावेळी मी झोपलो होतो. मोठा अपघात झाल्यानंतर रेल्वेतील पंख्याला मी पकडून बसलो. ट्रेन थांबल्यानंतर आम्ही खाली आलो. अपघातानंतर सगळेजण आम्हाला वाचवा असे म्हणत होते. आम्ही तरी दोन तीन जणांना बाजूला नेले. पण तेव्हाच पॅन्ट्रीकारला आग लागली म्हणून आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन पाहिले तर कुणाचे डोकं कुणाचे हात पाय नव्हते. सगळे जण तडफडत होते. आम्ही S5 बोगीमध्ये होतो. एकमेकांची मदत करत आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी कोणाची मदत करु कुठे जाऊ हे सूचत नव्हतं. आम्ही झोपलो होतो त्या ठिकाणी दोन वर्षांचे बाळ होते. सुदैवाने त्याला काहीही झालेलं नाही. आम्ही त्या बाळाला आणि त्याच्या परिवाराला बाहेर काढलं. आता आनंद तर होत नाहीये. सर्वांच्या हृदयात फक्त दुःखचं आहे," असे एका प्रवाशाने म्हटलं आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसने तामिळनाडूला जात असलेल्या आणखी एका प्रवाशाने या अपघाताची भीषणता सांगितली. "हा अपघात झाला तेव्हा आम्हाला धक्काच बसला आणि अचानक ट्रेनचा डबा एका बाजूला वळताना दिसला. ट्रेन इतक्या वेगाने रुळावरून घसरली की आमच्यापैकी बरेच जण डब्यातून खाली पडले. आम्हाला आजूबाजूला मृतदेह पडलेले दिसले. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुळावरून घसरलेले डबे दिसले. रुळावरून घसरलेल्या डब्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते," असे या प्रवाशाने सांगितलं.