भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.   

शिवराज यादव | Updated: Jun 30, 2024, 04:29 PM IST
भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना title=

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जवळपास 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ही मारहाण केली. या घटेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. 

भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष सुरु होता. मात्र नांदेडमध्ये विजयानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसत एका टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय आगे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी श्रीनगर भागात गजानन देगलुरकर यांच्या इमारतीत भाड्याने राहतात. काल रात्री भारत जिंकल्याने इमारतीच्या गच्चीवर विदयार्थी जल्लोष करत होते. तेव्हा गोधळ का करता म्हणुन 20 ते 25 युवक इमारतीत घुसले. त्यानी दरवाजाची तोडफोड केली. काही विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे तरुणांचं टोळकं पायऱ्यांवरुन वर जाताना दिसत आहे. यानंतर ते काही तरुणांना मारहाण करतानाही दिसत आहे. दरम्यान मुलं आपली जाव वाचवत पायऱ्यांवरुन खाली पळत जात असल्याचंही यात दिसत आहे. 

मारहाण झालेल्या एका पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, "काल आम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाहत होतो. यावेळी 7 ते 8 तरुण अचानक आले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्हाला त्यांनी काही बोलण्याची संधीही दिली नाही".

"20 ते 25 मुलं अचानक घरात शिरले. त्यांनी दरवाजाची तोडफोड केली. तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करत त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घराबाहेर सीसीटीव्ही लावण्यात आलं असल्याने ते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत," अशी माहिती घरमालक गजानन देगलुरकर यांनी दिली आहे. 

या घटनेमुळे श्रीनगर भागात शिकवणीसाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान या प्रकरणी घरमालक गजानन देगलुरकर यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भारताने दुसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. पण हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने जबरदस्त गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी धूळ चारली. 

जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीसह सूर्यकुमार यादव यानेही जबरदस्त झेल घेतल विजयात मोलाचा वाटा उचलला. तसंच विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय फलंदाजीत मोठं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्कराम यानेही सामन्यानंतर भारतीय संघाचं कौतुक केलं. "हा क्रिकेटचा पहिलाच सामना नाही, जेव्हा संघाला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करत संघाला मजबूत स्थितीत नेलं," असं त्याने म्हटलं.